बंद

    29.07.2022 : आनंदी राहणे जन्मसिद्ध हक्क; पण मिळविण्यासाठी प्रयत्न आवश्यक : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: July 29, 2022

    आनंदी राहणे जन्मसिद्ध हक्क; पण मिळविण्यासाठी प्रयत्न आवश्यक : राज्यपाल

    सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्वराने केवळ मनुष्याला विवेक बुद्धी दिली आहे. त्यामुळे काय नित्य आहे, आणि काय अनित्य आहे याचा निवाडा करून माणसाला आनंदी व संतुष्ट राहता येते. आनंदी राहणे हा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे; परंतु स्वराज्य प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे कठोर परिश्रम करावे लागले होते, त्याचप्रमाणे आनंदी राहण्यासाठी देखील परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २९) ‘सनातन उत्सव – हॅपिनेस अवर बर्थराईट’ या दिनेश शाहरा लिखित पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार कुलदीप सिंह, क्रिकेट समालोचक सुशील दोषी, अभिनेते दलिप ताहील, मज्जाविकार तज्ज्ञ डॉ पी एस रामाणी, तबला वादक अनुराधा पाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    सृष्टीच्या निर्मितीपासून जगात भौतिकता आहे तशीच नैतिकता देखील आहे. मानसिक शक्ती आत्मिक शक्तीमध्ये परावर्तित करण्याची जीवनकला भारतीय तत्वज्ञानात आहे. मनुष्याने जीवनात भौतिकता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधल्यास आनंदी जीवन जगता येईल असे राज्यपालांनी सांगितले.