बंद

    19.07.2022: सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप

    प्रकाशित तारीख: July 19, 2022

    सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप

    विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याची राज्यपालांची एनसीसी कॅडेट्सना सूचना

    एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवावे तसेच पुढील वर्षी अधिकाधिक सुवर्ण पदके जिंकावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्व कॅडेट्सना छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा व डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक भेट देण्यात आले. चंदिगढ येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी चमूने ६ सुवर्ण, ५ रौप्य व १ कांस्य पदक प्राप्त केले.

    यावेळी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कमोडोर सतपाल सिंह, ब्रिगेडिअर सी मधवाल, नेमबाजी चमूचे प्रभारी अधिकारी कर्नल सतीश शिंदे तसेच नेमबाजी स्पर्धेतील सहभागी स्पर्धक उपस्थित होते. महाराष्ट्र एनसीसीच्या नेमबाजी क्रीडा चमूमध्ये ८ मुले व ९ मुली असा १७ कॅडेट्सचा समावेश होता.