05.03.2022 : शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न
शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी डॉ दिनकर साळुंके, संचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, दिगंबर शिर्के, कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, प्रकुलगुरु प्रा. प्रमोद पाटील, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन गजानन पळसे, प्रभारी कुलसचिव डॉ विलास शिंदे, अधिष्ठाता, विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळांचे सदस्य, स्नातक व पालक उपस्थित होते.
दीक्षांत समारोहात ६२३६० उमेदवारांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. ऐश्वर्या मोरे हिला राष्ट्रपती सुवर्ण पदक तर स्वाती पाटील या विद्यार्थिनीला कुलपती सुवर्ण प्रदान देण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ हे प्रगतीशील विद्यापीठ आहे. विद्यापीठाला ए++ मानांकन मिळाले ही मोठी उपलब्धी आहे. विद्यापीठाच्या स्नातकांनी उच्च ध्येय समोर ठेवून, त्याच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम केल्यास सर्वांना श्रेष्ठ भारत आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकार करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अध्ययनासोबत नवीनतेचा ध्यास घ्यावा व उद्यमशील व्हावे. नवीनता ही इतिहास, तत्वज्ञान आदी कोणत्याही विषयात असते. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व दिले आहे. यास्तव सर्वांनी मातृभाषेचा गौरव वाढवला पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.