19.11.2021: राज्यपालांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स सन्मानित
राज्यपालांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स सन्मानित
सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालयांनी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना देय असलेली आधुनिक व परवडणारी आरोग्य सुविधा देण्यासाठी देशातील सर्वोत्तम खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन आपणहून अधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
मलयाल मनोरमा वृत्तसमूहाच्या ‘द वीक’ साप्ताहिकातर्फे देशाच्या विविध भागातील सर्वोत्तम हॉस्पिटल्सना राज्यपालांच्या हस्ते ‘बेस्ट हॉस्पिटल’ पुरस्कार मुंबईतील हॉटेल ताज महाल येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
करोना काळात भारतात सर्वोत्तम डॉक्टरांपासून तर हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयपर्यंत सर्वांनीच सेवा भावनेने उत्तम कार्य केले. या काळात विविध संस्थांनी वैयक्तिक करोना योद्ध्यांचा सत्कार केला. सर्वोत्तम सेवा देणाऱ्या देशातील बड्या खासगी हॉस्पिटल्सना सन्मानित करण्यासाठी ‘द वीक’ने पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी साप्ताहिकाचे अभिनंदन केले.
राज्यपालांच्या हस्ते दिल्ली, कोलकाता, चेन्नई व हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटल्स, मणिपाल हॉस्पिटल समूह, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, मेदांता – द मेडिसिटी, दिल्ली, झायडस, अहमदाबाद, अलेक्सिस हॉस्पिटल नागपूर यांना सर्वोत्तम हॉस्पिटल्स पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अपोलो हॉस्पिटल्सच्या वतीने मुख्याधिकारी संतोष मराठे, मेदांताच्या वतीने डॉ यतीन मेहता, मणिपाल बंगलोरच्या वतीने डॉ मनीष राज व अंजना चंद्रन यांनी तर कोकिलाबेन हॉस्पिटलच्या वतीने डॉ संतोष शेट्टी यांनी पुरस्कार स्वीकारले.
कार्यक्रमाला द वीकचे वरिष्ठ वृत्त संपादक स्टॅन्ले टॉमस, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे संचालक प्रो श्रीनाथ रेड्डी, मनोरमाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्रीकुमार मेनन, व्यवस्थापक जोजी झकारिया, ब्युरो चीफ ज्ञानेश जठार, तसेच विविध हॉस्पिटल्सचे मुख्याधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.