14.10.2021: बिर्ला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राजभवन येथे पोस्टेज स्टॅम्पचे अनावरण
बिर्ला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राजभवन येथे पोस्टेज स्टॅम्पचे अनावरण
बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
महात्मा गांधींशी घनिष्ठ संबंध असलेल्या बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली. आपल्या शिक्षण संस्थांमधून बिर्ला समूहाने भारतीय संस्कृती व नितीमूल्ये जोपासल्यामुळे समूहाचे नाव आदराने घेतले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.
कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष तसेच संस्थापक बसंत कुमार बिर्ला यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी (दि. १४) राजभवन येथे महाविद्यालयाचे छायाचित्र असलेल्या विशेष पोस्टेज स्टॅम्पचे व आवरणाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आदित्य बिर्ला केंद्राच्या ग्रामविकास व सामाजिक उपक्रम अध्यक्षा राजश्री बिर्ला (दूरस्थ माध्यमातून), महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे, संचालक डॉ नरेश चंद्र, महाराष्ट्र व गोव्याचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल हरीश चंद्र अगरवाल व बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पाटील उपस्थित होते.
अभिमत विद्यापीठ होण्याचा प्रयत्न करावा
स्वायत्तता प्राप्तीनंतर गुणवत्ता वृद्धिंगत करून नॅकचे उत्तम गुणांकन प्राप्त केल्याबद्दल बिर्ला महाविद्यालयाचे अभिनंदन करताना महाविद्यालयाने यानंतर अभिमत विद्यापीठ होऊन देशात नावलौकिक प्राप्त करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.
बिट्स पिलानी असो अथवा बिर्ला शाळा असो, बिर्ला यांनी केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. देशातील सर्व कामे गुणवत्तेने झाली तर देशातील गरिबी व बेरोजगारी दूर होईल सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाने मूल्य शिक्षणावर भर दिल्याचे सांगून शिक्षण नैतिकता व सदाचारावर आधारित असले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.