08.09.2021 : राज्यपालांच्या हस्ते ‘व्हाॅईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण
राज्यपालांच्या हस्ते ‘व्हाॅईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण
पत्रकार संघटनेने उच्च ध्येय समोर ठेवून काम करावे : राज्यपाल
पत्रकारांच्या व्यापक हितासाठी काम करताना पत्रकार संघटनांनी उच्च ध्येय समोर ठेवून मिशनरी स्पिरीटने काम करावे. पत्रकारांच्या समस्या शासनाकडे नेताना त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरण केल्यास त्यांची दखल घेणे भाग पडेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘व्हाॅईस ऑफ मिडिया’ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बुधवारी (दि. ८) करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
करोना काळात राज्यात अनेक पत्रकारांचे निधन झाले. मात्र नेमक्या किती पत्रकारांचा करोनामुळे मृत्यू झाला याबाबत अचूक माहिती एकत्रितपणे कोठेही उपलब्ध नाही हे खेदजनक आहे असे नमूद करून पत्रकार संघटनांनी पत्रकारांविषयी सर्व माहितीची योग्य नोंद घेऊन मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
पत्रकारीतेत तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य वर्धनासाठी काम करावे अशीही सूचना कोश्यारी यांनी यावेळी केली.
‘व्हाॅईस ऑफ मिडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार संघटना पत्रकारांचे आरोग्य, निवृत्त पत्रकारांना मदत, पत्रकारांचे प्रशिक्षण यांसाठी काम करणार असून आजवर १८ राज्यात संघटनेचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले.
नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर पांडे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, साम टीव्हीचे संपादक प्रसना जोशी, संपादक आशुतोष पाटील, सोराचे संपादक नरेंद्र बोर्लेपवार, संपादक तुळशीदास भोईटे, प्रजवाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, संपादक संतोष आंधळे, राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते.