बंद

    28.08.2021: लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: August 28, 2021

    लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

    नवी दिल्ली, 28 : लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता व योग्यता वाढविण्याकरिता मिळालेली उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

    श्री. कोश्यारी यांच्या संसदीय कार्यावर आधारित ‘भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, ज्येष्ठ नेते श्याम जाजू, चाणक्य वार्ता प्रकाशन समूहाचे प्रमुख डॉ. अमीत जैन यावेळी उपस्थित होते.
    श्री कोश्यारी पुढे म्हणाले, देशाची संसंद ही भारतीय लोकशाहीचे मंदिर आहे येथे देशाच्या वेगवेगळया भागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनहिताचे विषय मांडतात व जनभावनेला न्याय मिळवून देतात. लोकसभा आणि राज्यसभेत खासदार म्हणून कार्य करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संसदेला लाभलेल्या श्रेष्ठ नेत्यांच्या परंपरेवरही त्यांनी प्रकाश टाकला. संसद व विधिमंडळांच्या सदनामध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी आपल्या पदाचा गर्व न बाळगता जनसेवा करावी व स्वत:ची योग्यता वाढवावी असेही त्यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतीकारकांच्या बलिदानाचे स्मरण करून आदर्श भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरीकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, श्याम जाजू यांची भाषणे झाली. दिल्ली स्थित चाणक्य वार्ता प्रकाशनाने ‘भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन केले असून डॉ. अमीत जैन हे या पुस्तकाचे लेखक आहेत.