20.04.2021 : ‘राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
‘राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
‘रामायण सर्कीट तयार केल्यास रोजगार निर्मितीसह युवकांना प्रेरणा मिळेल’: राज्यपाल
प्रभू रामाप्रमाणे रामायण संस्कृती विश्वव्यापक असून नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, कंबोडिया यांसह अनेक देशात या संस्कृतीची पदचिन्हे आढळतात. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातील विविध ठिकाणे, तसेच रामायण संस्कृती जतन करीत असेलेले देश पर्यटनाच्या दृष्टीने जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल व युवा पिढीला नवी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.
वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दीनानाथ दुबे लिखीत *राम-रामायण तीर्थाटन के आयाम* या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २०) राजभवन मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
लोकांच्या मनात प्रभू रामाबद्दल विशेष आस्था आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेच्या माध्यमातून लोकांनी रामाची जीवन कथा भावभक्तीने पाहिली. भारतात देशाटन व तीर्थाटनाची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून रामायण पर्यटनाला चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
रामायण संस्कृतीशी संबंधित माहिती प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करताना प्रभू रामाप्रमाणे त्याग, समर्पण व भक्ती हे आदर्श जीवनात अंगीकारल्यास महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार करता येईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
‘स्माल इज ब्युटीफुल’ या उक्तीप्रमाणे ‘राम’ हे छोटेसे नाव असले तरीही ते जन्मापासून श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत साथ देणारे आहे. रामायणाचे सखोल अध्ययन केल्यास समाज सद्गुण आत्मसात करेल, असे राज्यपालांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इन्दिरा गांधी राष्ट्रीय कला केन्द्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानन्द जोशी, अयोध्या येथील डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित, जीवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर येथील पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त अध्यक्ष प्रो. राम अवतार शर्मा, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या कलानिधि विभागाचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) रमेश चन्द्र गौड़ आदी उपस्थित होते.