04.02.2021 : कोरोना योध्द्यांचे कार्य कार्य कौतुकास्पद : राज्यपाल
समर्पण आणि सेवा वृत्तीने केलेले कोरोना योध्द्यांचे कार्य कौतुकास्पद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
धुळे महानगरपालिकेत कोरोना योध्द्यांचा सत्कार
धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : समर्पण आणि सेवा हा प्रत्येक भारतीयाचा स्थायी भाव आहे. या भावनेतून कोरोना योध्द्यानी बजावलेली आपली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच भारतासारखा विशाल देश कोरोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणू शकला, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित कोरोना योद्धा सन्मान समारंभात ते बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार डॉ. फारुक शाह व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. करूणा, दया आणि सहानुभूती हे गुणही आपल्या अंगी आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात अनेकजण एकमेकांच्या मदतीसाठी धावून आले. किंबहुना इतरांची मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. केंद्र व राज्य सरकारने या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगत सतर्क राहणे आवश्यक आहे. एकमेकांना सहकार्य करीत पुढे जावे, असेही त्यांनी सांगितले.
महापौर श्री. सोनार म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने पुरेपूर प्रयत्न केले. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. खासदार डॉ. भामरे म्हणाले, कोरोना विषाणूमुळे जगासह देशात भीतीचे वातावरण होते. धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा संकटकाळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणीव ठेवत आपला सेवेचा वसा सोडला नाही. कोरोना योध्द्यांची ही कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी असून ती अनेकांना समाजकार्य करण्यास प्रवृत्त करेल.
आमदार श्री. रावल म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशासह राज्यात सर्वाधिक आहे. एवढेच नव्हे, तर लसीकरणातही धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या मदतीला धुळेकर धावून आले होते, असेही त्यांनी सांगितले.
जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख यांनी आभार मानले. यावेळी नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
यांचा झाला कोरोना योद्धा म्हणून सत्कार
महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, शिरपूरचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांच्या पत्नी संगीता माळी, अग्रवाल भवनचे अध्यक्ष विनोद मित्तल, डॉ. चुडामण पाटील यांचे वडील पुंडलिक पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, दीपकांत वाघ, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. मृदुला द्रविड, डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, प्रवीण पवार, हाजी शवाल अन्सारी, अमिन पटेल, दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य सभापती मनीषा गिरासे, चेतन सिसोदिया, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. निर्मलकुमार रवंदळे, डॉ. मुकरम खान, डॉ. जिनेंद्र जैन, शोभाबाई मोरे, आकाश कांबळे, सचिन शेवतकर, विजय पवार, अनिल वानखेडे, अबू मसूद अन्सारी यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
00000
जिल्हा माहिती कार्यालय,
प्रशासकीय संकुल, धुळे – ४२४ ००१
वृत्त क्रमांक : 082