18.01.2021 राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील करोना योध्दांचा राजभवन येथे सत्कार
राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील
करोना योध्दांचा राजभवन येथे सत्कार
मुंबई दि. 18 : सेवेचे फळ मिळो अथवा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तीमध्ये करुणा, सेवा भाव व इतरांना मदत करण्याची भावना उपजत आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही या देशातील शिकवण आहे. करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर आपण करोनापेक्षाही मोठ्या शत्रूला पराभूत करू शकू असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने करोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील २२ करोना योध्दांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार मनोज कोटक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसेच करोना योद्धे उपस्थित होते.
करोना योद्धे पोलीस, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी केवळ ‘कार्यालयीन जबाबदारी’ या भावनेने काम न करता सेवाभावाने काम केले. ही भावना महत्वाची असते. आज अनेक लोक आपल्या कमाईचा काही भाग समाज कार्याला देत आहेत. सेवा करणे काही लोकांच्या रक्तात असते. अश्या लोकांना आपण वंदन करतो असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ. विद्या ठाकूर, अधिक्षिका, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर, डॉ. सीमा मलिक, डॉ. काजोल बादवे, डॉ. रिता सिंह, डॉ. तेजल कल्पेश शाह, पोलीस उपयुक्त परिमंडळ ७ प्रशांत कदम, पंतनगर पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार तौफिक इब्राहीम बाबू तांबे, रत्नाकर जगताप, रंगमंच कामगार संघ, मनोज सोनी, बाळकृष्ण बने, हरेन मर्चंट, बिंदू त्रिवेदी, शिवशंकर कोचरेकर, प्रवीण कवाडे, नरेश दोशी, प्रीतेश मैशिरी, अशोक कुमार रामाश्रय राय, किरण गायचोर, सुशील सहानी, श्रीराम जंगम, नित्यानंद शर्मा व अश्विनीकुमार पांडेय यांना सन्मानित करण्यात आले.