26.06.2020 राज्यपालांनी युवकांना सांगितला उत्तम वाक्पटू होण्याचा मूलमंत्र
राज्यपालांनी युवकांना सांगितला उत्तम वाक्पटू होण्याचा मूलमंत्र
उत्तम वक्ता होण्याकरिता आत्मविश्वास, अभ्यास, मनन आवश्यक: राज्यपाल
उत्तम वक्ता होण्याकरिता आत्मविश्वास व निर्भिडपणा महत्वाचा आहे. मात्र त्यासोबतच अभ्यास, श्रवण,मनन आणि चिंतन देखिल तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी युवकांनी हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक विकसित केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
नैनीताल येथील कुमाऊॅं विद्यापीठातर्फे आयोजित “समयस्फूर्त वक्तृत्व कला” या विषयावरील कार्यशाळेचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज भवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.
आत्मविश्वास नसल्यास आपली छाया देखील आपल्याला भिववीत असते, असे सांगून सातत्यपूर्ण अभ्यास व आत्मविश्वासाच्या मदतीने वक्तृत्व कला प्राप्त केली जाऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.
आपल्या महाविदयालयीन जीवनातील अनुभव सांगताना राज्यपाल म्हणाले की उत्तम वक्ता होण्याकरिता, उत्तम श्रोता होणे महत्वाचे असते. स्वाध्याय, मनन व चितंन देखिल तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वक्तृत्वासोबतचे लेखन कला देखील विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक विकसीत केली पाहीजे, अशी सूचना राज्यपालांनी युवकांना केली.
कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी कुमाऊॅं विद्यापीठाचे कुलगुरु डॉ एन के जोशी, प्रो. पी सी कविदयाल, कार्यशाळेच्या संयोजिका आस्था नेगी तसेच विविध ठिकाणांहून शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.