बंद

    13.03.2020 : महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: March 15, 2020

    राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
    महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : राज्यपाल

    कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे बरेचदा घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व जगाने योग स्वीकारलेला असताना महिलांनी थोडा वेळ स्वत:च्या आरोग्यासाठी द्यावा, योगासने करावीत, योग्य आहार करावा तसेच वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करून स्वतःला सुदृढ ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.
    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे वाळकेश्वर परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
    यावेळी बोलताना ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणल्या की अनेकदा महिलांचे आजार सहज बरे होण्यासारखे असले तरीही त्या संकोचामुळे चाचणी करून घेत नाही.
    ‘करोना‘साठी मास्क अनावश्यक : डॉ. पल्लवी सापळे
    कोरोना जिवाणू बद्दल सर्वत्र पसरलेली भीती अनावश्यक आहे. नियमितपणे हात धुण्याची सवय लावणे तसेच स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविणे मात्र आवश्यक असल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी संगितले. करोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक लोक विनाकारण मास्क वापरत आहेत, असे सांगून मास्कच्या अतिवापरामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्यामुळे मास्कचा वापर करू नये, डॉक्टरांना करू द्यावा असे त्यांनी संगितले. शिबिरात वाळकेश्वर परिसरातील २०० हून अधिक महिलांनी आरोग्य तपासण्या केल्या.
    महिला आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला आमदार आशीष शेलार, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ संजय सुरासे, डॉ. इंद्रायणी साळुंके व अनेक वैद्यकीय चिकित्सक तज्ञ उपस्थित होते.