31.07.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन
झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २१ वे राज्यपाल आहेत.
शपथविधी सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. तेथील आपल्या दीड वर्षांच्या कालावधीत त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला. राज्यपाल राधाकृष्णन यांचा अल्प परिचय सोबत जोडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आल्याचा सार्थ अभिमान
शपथविधीनंतर बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पावन जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्र भूमीत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचे सच्चे पुरस्कर्ते होते. राज्यातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी तसेच समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी आपण शासनाला सर्वतोपरी सहकार्य करू असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे. गरिबी दूर करण्यासाठी विकासाशिवाय दुसरा मंत्र नसल्याचे त्यांनी सांगितले.