31.05.2024 : बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान
बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान
अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी थरमॅक्सच्या अनु आगा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करण्याची राज्यपालांची सूचना
आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा ‘के एस बसू जीवन गौरव पुरस्कार’ थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्षा व ‘टीच फॉर इंडिया’ कार्यक्रमाच्या संस्थापिका अनु आगा यांना समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शुक्रवारी (दि. ३१) पार पडलेल्या असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अनु आगा यांना यशस्वी उद्योग व्यवस्थापनासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादव, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, बीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यांसह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते.
देशात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या निवडक चांगल्या संस्था आहेत. परंतु बहुतांशी संस्था सरासरी गुणवत्तेच्या आहेत असे नमूद करून व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी तसेच व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व्हावे, या दृष्टीने बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. विदेशातून एमबीए पदवी प्राप्त करून युवक तेथेच नोकरी व्यवसायासाठी स्थायी होत असल्यामुळे प्रतिभावंतांचे स्थलांतर होते, या दृष्टीने देशातील व्यवस्थापन शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जगातील अनेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. परंतु, जागतिक दर्जाच्या कंपन्या, अकॉउंटिंग – ऑडिट फर्म्स, कन्सल्टन्सी फर्म्स भारताच्या का नाहीत, या दृष्टीने चिंतन झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
भारतातील महिला गृह तसेच व्यवसायांच्या उत्कृष्ट व्यवस्थापिका असल्याचे सांगून बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यावे, तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळी शाखा निर्माण करावी अशी सूचना राज्यपालांनी केली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी अनु आगा यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल राज्यपालांनी असोसिएशनचे तसेच निवड समितीचे अभिनंदन केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी साहिल गोयल, संस्थापक ‘शिप रॉकेट’ यांना मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द ईअर हा पुरस्कार देण्यात आला तर ‘बुक माय शॊ’चे संस्थापक आशिष हेमराजानी यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड पुरस्कार देण्यात आला.
मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द इयर, एक्सल अशुअर्ड एन्टरप्राईस ऑफ द इयर हे पुरस्कार देखील यावेळी देण्यात आले. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ माशेलकर यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका विशद केली तर शैलेश हरिभक्ती यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष ‘इ ऍम्बीट’ डिजिटल प्रकाशनचे उदघाटन करण्यात आले.