बंद

    30.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: November 30, 2022

    राज्यपालांच्या हस्ते गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. ३०) शीख समाजाचे संस्थापक व पहिले गुरु गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील ‘गुरुनानक देव के संवाद और समाज को मार्गदर्शन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

    लेखक व क्रीडा सुविधा विकासक राजन खन्ना तसेच स्तंभलेखक व संशोधक डॉ रतन शारदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

    गुरुनानक हे ईश्वराचे अवतार होते. वडिलांनी शेत राखण्यासाठी पाठवले असताना त्यांनी चिमण्यांमध्ये परमात्मा पाहिला व त्यांना मुक्तपणे दाणे खाऊ दिले, या घटनेचे स्मरण करुन नानक यांच्या जीवनातून त्याग, करुणा, परोपकार व प्रेम या गुणांचे दर्शन होते असे राज्यपालांनी सांगितले.

    गुरूनानक यांनी नामजपाचे महत्व विशद केले तसेच सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्यास सांगितले. गुरुनानक यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन गुरुगोविंद सिंह यांच्यासारखे शूरवीर संत निर्माण झाले असे राज्यपालांनी सांगितले.

    पारतंत्र्य काळात सनातन धर्मावर आलेले मळभ गुरु नानक यांनी आपल्या शिकवणीतून दूर केले असे सांगून तणाव मुक्तीसाठी गुरुनानक यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रासंगिक आहे असे लेखक राजन खन्ना यांनी यावेळी सांगितले. तर, गुरुनानक यांनी विविध देशांमध्ये अंदाजे तीस हजार किलोमीटर भ्रमण करून प्रपंच सांभाळून सहज मुक्तीचा मार्ग दाखवला,असे लेखक डॉ रतन शारदा यांनी सांगितले.

    प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, माजी प्रशासकीय अधिकारी विजय सतबीर सिंह, सेवानिवृत्त अधिकारी ले.जन. के टी परनाईक, अवतार सिंह सचदेव, आदी उपस्थित होते. बाल मलकित सिंह यांनी आभार प्रदर्शन केले.