बंद

    29.10.2021:: सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांकडून शरणकुमार लिंबाळे सन्मानित

    प्रकाशित तारीख: October 30, 2021

    सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांकडून शरणकुमार लिंबाळे सन्मानित
    देशात जातिनिहाय जणगणनेची मागणी होणे क्लेशदायक :राज्यपाल

    भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. अश्यावेळी जातीनिहाय जनगणनेची मागणी होणे अत्यंत क्लेशदायक असून, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जातिव्यवस्थेचे उच्चाटन’ या सिद्धांताच्या विपरीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शुक्रवारी (दि. २९) राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    सत्कार सोहळा तसेच सनातन पुस्तकावर साहित्यिकांच्या परिसंवादाचे आयोजन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखे
    च्या वतीने करण्यात आले होते.

    समाजात विशेषतः ग्रामीण भागात आजही जातीभेद आहेत असे नमूद करून साहित्याच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा, सामाजिक कटुता, वैमनस्य संपावे अशी अपेक्षा व्यक्त करताना भारत-भारती हाच प्रत्येक नागरिकाचा परिचय असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    धर्म हा भारताचा प्राण आहे. परंतु धर्म म्हणजे योग्य आचरण, असे सांगून धर्म नष्ट झाला तर देश नष्ट होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    एक साहित्य प्रेमी या नात्याने शरणकुमार लिंबाळे यांच्यासारख्या योग्य व्यक्तीला सरस्वती सन्मान दिल्याबद्दल राज्यपालांनी पुरस्कार समितीचे अभिनंदन केले. ‘सनातन’चे भाषांतर अनेक भारतीय भाषांमध्ये व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरणकुमार लिंबाळे यांनी सत्काराला उत्तर दिले.

    कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्रीधर पराडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पाठक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, अभिराम भडकमकर, डॉ पृथ्वीराज तौर, मंजुषा कुलकर्णी, रवींद्र गोळे, बळीराम गायकवाड, डॉ अरुण ठोके आदी उपस्थित होते.