बंद

    30.05.2024: महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान

    प्रकाशित तारीख: May 30, 2024
    30.05.2024:  एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्र'  प्रदान

    देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान

    महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान

    एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते पुण्यासारखी दुर्घटना झाली नसती : राज्यपाल रमेश बैस

    एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल. पुणे येथील युवकाला एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून दुर्घटना घडली नसती, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या ‘प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात’ राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

    आपण स्वतः एनसीसी कॅडेट होतो असे नमूद करून देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व बाणवले, तर देश अतिशय वेगाने प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने आजपर्यंत २३ वेळा पंतप्रधानांचे ध्वजनिशान जिंकले तसेच ८ वेळा महाराष्ट्र संचालनालय उपविजेते ठरले आहे, याबद्दल राज्यपालांनी राज्यातील एनसीसीच्या सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण १.१७ लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. पुढील १० वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या १.८५ लाख इतकी वाढविली जाणार आहे, हे कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.

    या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, शासनाचे अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.