28.10.2024: राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान
‘कॉटन मॅन ऑफ इंडिया’ सुरेश कोटक वस्त्र शिरोमणी पुरस्काराने सन्मानित
भारतीय वस्त्रोद्योगाला पुढील १०० वर्षे उत्तम भवितव्य : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
कृषीनंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. शिक्षित तसेच अशिक्षित लोकांना सामावून रोजगार मिळवून देणारे हे देशातील महत्वाचे क्षेत्र आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण व कालानुरूप बदल केल्यास पुढील किमान १०० वर्षे भारतीय वस्त्रोद्योगाला उत्तम भवितव्य राहील. मात्र जोवर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक होत नाही तोवर या वस्त्रोद्योग क्षेत्रात आघाडीवर राहता येणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) या संस्थेचा ७० वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मॅरिअट, सहार मुंबई येथे सोमवारी (दि. २८) आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेच्या संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष सुनील पटवारी, केन्द्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्सप्रोसिलचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक डॉ. सिद्धार्थ राजगोपाल आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
जगातील प्रत्येक प्रगतिशील देशांच्या विकासात वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान मोठे असल्याचे सांगून देशांची अर्थव्यवस्था वाढते तेंव्हा दुर्दैवाने वस्त्रोद्योग क्षेत्रावरच प्रथम विपरीत परिणाम होतो असे राज्यपालांनी सांगितले. वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक हितधारक असतात. त्यामुळे प्रत्येक हितधारकाची काळजी न घेतल्यास उद्योग कोसळेल असे राज्यपालांनी सांगितले.
आपण स्वतः वस्त्रोद्योग निर्यात संस्थेचे सदस्य होतो. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना वस्त्रोद्योग क्षेत्र मोठे योगदान देईल असा विश्वास वाटतो. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना काही अडचण आल्यास आपण केंद्र सरकारकडे व्यक्तिशः पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
राज्यपालांच्या हस्ते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कॉटन मॅन ऑफ इंडिया’ सुरेश कोटक यांना ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार देण्यात आला. संजय जयवर्थनलू (वस्त्र विभूषण) व राजेंद्रकुमार दालमिया (वस्त्र भूषण) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अनिल कुमार जैन, एम. नाचिमुथू, दीपाली गोयंका, राजिंदर गुप्ता, एस पी ओसवाल, कुलिन लालभाई आदींना यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.