बंद

    29.09.2022: सामान्य व्यक्तींचे उत्थान, राष्ट्रनिर्मितीतील खरे योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

    प्रकाशित तारीख: September 29, 2022

    सामान्य व्यक्तींचे उत्थान, राष्ट्रनिर्मितीतील खरे योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
    भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्र संमेलनात प्रतिपादन
    नागपूर – 29 सप्टेंबर 2022

    कुटुंबातील व्यक्तींबद्दल ज्‍या उत्कटतेने आपण विचार करतो तीच उत्‍कटता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा समाजपरिवर्तनासाठी प्रत्‍येकामध्‍ये असली पाहिजे. सामान्यातील सामान्य व्यक्तींचे उत्थान केले तरच राष्ट्रनिर्मितीमधे आपण खरे योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

    भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्‍कर्ष’च्‍या उद्घाटन प्रसंगी राज्‍यपाल बोलत होते. गुरुवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्‍कर्ष’ तसेच, प्रबुद्ध जन संमेलन व चिंतन बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भारत विकास परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. गजेंद्रसिंह संधू होते तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्‍थ‍िती लाभली. व्‍यासपीठावर सीए ब्रिजकिशोर अग्रवाल, भारत विकास परिषदेचे क्षेत्रीय अध्‍यक्ष सुधीर पाठक, प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुशे यांचीही उपस्‍थिती होती.

    गेल्या 8 वर्षात देशने वेगाने उत्कर्ष केला आहे. सर्वांनी अधिक मोठ्या जोमाने संपर्क, सहयोग, सेवेच्‍या माध्यमातून उत्साहाने काम केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 मिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न वेळेच्या आधीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असे राज्यपाल म्‍हणाले. भारत विकास परिषदेच्या देशभरातील कार्याचा गौरव करताना राज्यपालांनी सांगितले की नागपुरातील ‘उत्कर्ष’ संमेलनाच्या मध्यमाने संपर्क, सहयोग आणि सेवा अधिक बळकट करून तळागाळातील लोकांच्या उत्थानचे कार्य सुरू ठेवावे.

    ब्रिजकिशोर अग्रवाल म्‍हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे उत्थान काळाची गरज असून भाविप वनवासी लोकांचा विकास, गरिबांचे उत्थान करून त्‍यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक आघाड्यांवर कार्यरत आहे.

    भाविपने समाजातील तळागाळातील लोकांना सधन लोकांसोबत जोडून एक साखळी तयार करण्‍याचे कार्य सुरू असून सर्वांनी या देशकार्यात सहभागी व्‍हावे, असे गजेंद्रसिंह संधु यांनी उपस्थितांना आवाहन केले.

    प्रास्ताविकातून भाविपच्‍या विविध प्रकल्‍पांची माह‍िती देताना सुधीर पाठक म्‍हणाले, भाविप आगामी 25 वर्षात समाजोपयोगी स्थायी प्रकल्प उभारू इच्छिते.

    कार्यक्रमाच्या संयोजिका सीमा मुनशी, पल्लवी कुळकर्णी, चंद्रशेखर घुशे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मुनशी व लक्ष्मीनिवास जाजू यांनी केले. यावेळी दानशूर विकास रत्न पुरस्‍कार देऊन दानदात्‍यांचा सत्कार करण्यात आला.
    ……………
    स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याची ही वेळ – नितीन गडकरी

    स्वामी विवेकानंद यांनी 21 वे शतक हिंदुस्तानचे असेल असे म्हंटले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत विकास परिषदेने दूरदृष्टी, गती आणि नियोजन ठेऊन भविष्यातील वाटचाल करावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. देशातील 124 आकांशीत जिल्ह्यांमध्ये अनेक समस्या असून तिथे विकासाला भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यामध्ये काम होण्याची अपेक्षा असून गावांना समृद्ध कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्‍यांनी भाविपला केले. भाविपच्‍या स्मरणिकेचे गडकरी यांचया हस्‍ते प्रकाशन करण्यात आले. दुपारच्‍या सत्रात विवेकानंद केंद्र कन्‍याकुमारीच्‍या उपाध्‍यक्षा निवेदिता भिडे व प्रकाश पाठक यांचे उद्बोधन झाले.