29.07.2025: राज्यातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषा वर्ग सुरु करण्यास सहकार्य करणार : राजदूत किची ओनो

राज्यातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषा वर्ग सुरु करण्यास सहकार्य करणार : राजदूत किची ओनो
भारत व जपानचे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध अतिशय घनिष्ट आहेत. परंतु, भारतातील युवकांना जपानच्या विद्यापीठांबद्दल फारशी माहिती नाही. भारतातून अवघे १६०० विद्यार्थी जपान येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्याउलट चीनमधील लाखाहून अधिक विद्यार्थी जपान येथे शिक्षण घेत आहेत, असे नमूद करून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषांचे वर्ग सुरु करण्याच्या कार्यात आपण सर्वतोपरी सहकार्य करु, असे प्रतिपादन जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी येथे केले.
मुंबई भेटीवर आलेल्या जपानच्या राजदूतांनी मंगळवारी (दि. २९) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
जपान – भारत शैक्षणिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने या वर्षी हैदराबाद येथे विद्यापीठ परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजदूत किची ओनो यांनी यावेळी सांगितले. उभय देशांमधील लोक स्तरावर संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने जपान कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान व विद्यार्थी आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे ओनो यांनी सांगितले.
जपानी पर्यटक अधिक संख्येने भारतात येण्यासाठी येथील पायाभूत सुविधा अधिक विकसित करणे, पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याच्या सुविधा वाढवणे तसेच जपानी भाषेच्या दुभाषांची उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे राजदूतांनी नमूद केले.
जपान व भारताचे राजनैतिक संबंध अतिशय घनिष्ट आहेत. परंतु त्या तुलनेत उभयपक्षी व्यापार चीन – जपान व्यापाराच्या तुलनेने अतिशय कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी दोन्ही देशांमधील चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये तसेच सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. तसेच व्यापाराशिवाय कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य आदी क्षेत्रात सहकार्य वाढवणे आवश्यक आहे,असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी राजदूतांना सांगितले.
जपानमध्ये भारतीय विद्यार्थी कमी येण्याला तेथील भाषेची अडचण असल्याचे नमूद करून आपण मुंबईसह इतर विद्यापीठांना जपानी भाषेचे वर्ग सुरु करण्याबद्दल सूचित केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
बौद्ध धर्मामुळे भारत व जपान मधील सांस्कृतिक संबंध घनिष्ट आहेत असे सांगून हे संबंध आणखी वाढविण्यासाठी जपानने क्रीडा – विशेषतः व्हॉलीबॉल व टेबल टेनिस -, कृषी विज्ञान – विशेषतः मशरूम लागवड – या क्षेत्रात राज्याला सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.
जपानने मातृभाषा जपल्यामुळे तेथील संस्कृतीवर इंग्रजी भाषेसोबत येणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला नाही. भारतातील लोकांना जपानच्या लोकांची शिस्तबद्ध जीवनशैली फार आवडते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
वस्त्रोद्योग क्षेत्रात जपानने भारताला सहकार्य केले तर त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागांना होईल असे राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित विक्रेता – ग्राहक परिषदेचे आयोजन केले जावे असे राज्यपालांनी सांगितले. वस्त्रोद्योगाव्यतिरिक्त रत्न व आभूषण तसेच हिरे व्यापार या क्षेत्रात देखील भारतीय उत्पादने जपानी नागरिकांच्या पसंतीस उतरतील, असे राज्यपालांनी सांगितले.
भारतीय चित्रपट जपानमध्ये लोकप्रिय असून ‘मुत्थु’ या तामिळ चित्रपटामुळे रजनीकांत यांचे नाव जपानमध्ये घरोघरी पोहोचले होते असे नमूद करून जपानने चित्रपट निर्मित क्षेत्रात देखील सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. चित्रपट तसेच अनिमेशन निर्मितीच्या माध्यमातून पर्यटनाला देखील चालना देता येईल असे मत यावेळी राजदूत किची ओनो यांनी व्यक्त केले.
बैठकीला जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.