बंद

    28.09.2024 : दिव्यांगांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: September 29, 2024
    दिव्यांगांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात - राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

    विसाव्या दिव्य कला मेळाव्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

    दिव्यांगांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

    पुणे, दि.२८:- दिव्यांगांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. दिव्य कला मेळयाद्वारे दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याची संधी उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

    केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदनावर आयोजित करण्यात आलेल्या दिव्य कला मेळयाचा शुभारंभ राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री विरेंद्र कुमार, खासदार श्रीरंग बारणे, मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजीव शर्मा, राष्ट्रीय दिव्यांगजन वित्तीय आणि विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन शहा यावेळी उपस्थित होते.

    दिव्य कला मेळयात सहभागी झालेल्या दिव्यांगांचा उत्साह, त्यांची कटिबध्दता आणि कला पाहून आनंद झाला असे सांगून राज्यपाल म्हणाले, या मेळयाद्वारे दिव्यांगांची शक्ती, दृढनिश्चय दिसून आला. दिव्य कला मेळयामुळे दिव्यांगांची प्रतिभा दिसून आली असून समाजासाठी ती प्रेरणादायी आहे. हा दिव्य कला मेळा केवळ कला, हस्तकला आणि उद्योजकतेचा उत्सव नाही तर दिव्यांगामधील नाविन्यता आणि उद्योजकता या गुणांचे प्रदर्शन आहे. या मेळयामुळे दिव्यांगांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला आहे. शासनासह विविध संघटना, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या एकत्रित सहकार्याने दिव्यांगांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचे सांगितले.

    सामाजिक न्याय आणि सर्वसमावेषक विकासात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, दिव्य कला मेळयामुळे दिव्यांगजन आर्थिकदृष्टया सक्षम होत असून सामाजिकदृष्टयाही त्यांचे सक्षमीकरण होत आहे. प्रधानमंत्री यांनी सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हा मंत्र दिला आहे. दिव्यांगाच्या विकासाने आणि सहभागाने समाजाचा सर्वसमावेशक विकास होत आहे असा विश्वास राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. १९ ठिकाणी आयोजित केलेल्या या मेळ्यांमध्ये १ हजार ४५० दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतला आहे. तसेच या मेळ्यांद्वारे दिव्यांग उद्योजकांनी सुमारे ११ कोटी पन्नास लाख रुपयांची कमाई केली याचाा आनंद झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. प्रतिभावान दिव्यांगजनांना जेव्हा योग्य संधी आणि व्यासपीठ मिळते तेव्हा ते प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतात. यासाठी या मेळ्यांबरोबरच शासन दिव्यांगांसाठी रोजगार मेळावेही आयोजित करत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्री विरेंद्र कुमार म्हणाले, दिव्य कला मेळयाद्वारे समाजातील शेवटच्या व्यक्तिला मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे. यामुळे दिव्यांग, दिव्यांगाचा परिवार आर्थिकदृष्टया सक्षम होत असून त्यामुळे समाजाचा सर्वांगिण विकास होणार आहे. दिव्यांग कला मेळयाद्वारे दिव्यांग कला शक्तीचे प्रदर्शन होत आहे. नुकत्याच पॅरीस येथे पार पडलेल्या पॅरालिंम्पीकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी 84 क्रीडा प्रकारात सहभागी होऊन चमकदार कामगिरी करत २९ पदके प्राप्त करुन देशाचा नावलौकिक वाढवला आहे. या मेळयाद्वारे शंभर दिव्यांगांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. दिव्यांगाच्या सर्व समावेशक विकासासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत असून त्याद्वारे त्यांना सक्षम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे संस्कृतीचे माहेरघर असून दिव्यांगांना साथ देण्यात मागे राहणार नाही अशी अपेक्षा श्री.विरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली.

    खासदार श्रीरंग बारणे यांनी दिव्य कला मेळा दिव्यांगांसाठी मोठी संधी आहे असे सांगितले. देशभरात राबविण्यात आलेला हा उपक्रम पुण्यामध्ये आयोजित केल्यासाठी त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले. संयुक्त सचिव राजीव शर्मा यांनी सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम आणि विविध योजनांविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून या मेळयाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरुपात स्वयंचलीत सायकली, विविध उपयोगाच्या वस्तूंचे राज्यपालांच्याहस्ते वाटप करण्यात आले आहे. राज्यपालांनी दिव्यांगांशी आत्मीयतेने आणि आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दिव्यांग विद्यार्थी प्रथमेश सिन्हा याने कार्यक्रमाबद्दल दिलेली माहिती आणि व्यक्त केलेल्या भावनांबद्दल राज्यपालांनी त्याच्याशी संवाद साधून कौतुक केले. पुणे बाल कला संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी गणेश स्तुती सादर केली. श्री.नवीन शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    जिल्हा माहिती कार्यालय, पुणे