बंद

    28.05.2023: वीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनावली प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

    प्रकाशित तारीख: May 29, 2023

    वीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनावली प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

    सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. २८) स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरिवली येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    खासदार गोपाल शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्याला माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सुनील राणे, योगेश सागर, मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, हेमेंद्र मोदी, नितीन प्रधान, मुकेश भंडारी, अजयराज पुरोहित, डॉ योगेश दुबे व नागरिक उपस्थित होते.

    वीर सावरकर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराच्या इतिहासाने प्रक्षुब्ध होऊन त्यांनी बंधू गणेश सावरकर यांच्या मदतीने देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अभिनव भारत आंदोलन सुरु केले, असे राज्यपालांनी सांगितले.

    सावरकर उत्तम वक्ते, लेखक व इतिहासकार होते. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये अत्यंत शारीरिक हालअपेष्टा सहन करून देखील त्यांचे धैर्य डगमगले नाही, असे त्यांनी सांगितले.

    स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना कमी लेखले गेले याबद्दल खेद व्यक्त करुन क्रांतिकारकांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    सुरुवातीला राज्यपालांनी सावरकर यांच्या जीवनावरील प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते डॉ परेश नवलकर, बासरी वादक पं. रूपक कुलकर्णी, सुधा वाघ, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.