28.05.2023 : न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.
राजभवन येथे रविवारी (दि. २८) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर गणमान्य निमंत्रित उपस्थित होते.
सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पटणार यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.
दिनांक ३१ मे १९६१ रोजी न्या. रमेश धानुका यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी संपादन केली. १९८५ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या तिसऱ्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि द्वितीय क्रमांक मिळविला. ते गेल्या अनेक वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ वकील पॅनेलवर होते. न्या. धानुका दिनांक २३ जानेवारी २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले.