27.10.2025: विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या वाटचालीत प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे:- राज्यपाल
 
                                विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या वाटचालीत प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे
राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. २७ :- पायाभूत सुविधांसह अन्य विविध क्षेत्रातही देशाने अभूतपूर्व अशी झेप घेतली आहे. या सुविधांमुळे भारत देश आत्मनिर्भरतेकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश विकसित भारत- २०४७ या ध्येयाकडे वाटचाल करीत असून यामध्ये प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादान राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भारत २४ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या विकसित भारत लीडरशिप समिट २०२५ चा शुभारंभ राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी वृत्त वाहिनीचे डॉ. जगदीश चंद्र, मनोज जग्याशी शशिकांत शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारताने गेल्या दहा वर्षांत आर्थिक दृष्टीने ११ व्या स्थानावरून पाचव्या आणि आता चौथ्या क्रमांकाकडे झेप घेतली आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. तसेच गेल्या दशकात २५ कोटींपेक्षा अधिक लोकांना गरीबीच्या रेषेबाहेर आणण्याचे ऐतिहासिक कार्य शासनाने केले असल्याचे ते म्हणाले.
विकसित भारत २०४७ मध्ये केंद्र शासनामार्फत केले जात असलेले काम,देशाच्या प्रगतीचा, जनतेच्या विकासाचा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना भारत २४ वाहिन्यांच्या माध्यमातून सर्वदूर पोहचविण्याचे काम होत असल्याबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या वहिनीच्या कामाचे कौतुक केले.
या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
००००००
 
         
        