27.05.2025: विकास सर्वसमावेशक होण्यामध्ये पंचायत राज संस्थांची भूमिका महत्वाची : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

विकास सर्वसमावेशक होण्यामध्ये पंचायत राज संस्थांची भूमिका महत्वाची : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
जपानला मागे टाकून भारत चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता झाला आहे. कालांतराने जर्मनीला मागे टाकून देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होईल. देशाचा विकास सर्वसमावेशक होण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, ग्रामीण भागातील लोकांचा विकास होणे आवश्यक असून या कार्यात पंचायत राज संस्थांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना मंगळवारी (दि. २७) यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
खऱ्या लोकशाहीची सुरुवात ग्रामीण भागापासून होते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांचे कार्य अतिशय चांगले असून पंचायत राज संस्थांच्या सहकार्याने राज्याचे सकल घरगुती उत्पादन वाढविण्यास मदत होईल व राज्य एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट प्राप्त करेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
राज्यातील अनुसूचित विभागांचे पालक या नात्याने आपण राज्यातील अनुसूचित भागांमध्ये आदर्श आदिवासी गावे विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असून या संदर्भात राज्य शासनाने आदेश निर्गमित केल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. गरीब लोकांना घरे बांधून देण्याच्या पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याबद्दल राज्यपालांनी ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातून अधिकाधिक लखपती दीदी तयार व्हाव्या तसेच केंद्र सरकारच्या आघाडीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या अशी अपेक्षा व्यक्त करताना राज्यपालांनी देश स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते गौरव पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या भाषणातून राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या विकास कार्यक्रमात ग्राम विकास विभागाने चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच १५० दिवस कार्यक्रमांमध्ये विभागाने पहिला क्रमांक प्राप्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत राज्यात २० लाख घरांची मंजुरी होती व राज्याने दहा लाखांचा पहिला टप्पा पार केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच राज्यातील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचे मुख्य अधिकारी तसेच ग्राम विकास विभागाचे पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार अनुक्रमे वर्धा, अमरावती व सोलापूर जिल्हा परिषदांना देण्यात आले तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट राज्यस्तरीय पंचायत समिती पुरस्कार कळमेश्वर, जिल्हा नागपूर, जामनेर जिल्हा जळगाव व शिराळा जिल्हा सांगली या पंचायत समित्यांना देण्यात आले.