बंद

    26.11.2023: राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 26, 2023

    राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

    राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पंधरा वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आपली श्रद्धांजली वाहिली.

    भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.

    हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

    यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

    यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते.