26.11.2023: राज्यपालांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना यावर्षीचा मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना यावर्षीचा मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान
मुंबई दि.२६ : सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा मेमोरियल अवार्डची स्थापना केल्याबद्दल आणि या पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती आणि संस्थांची निवड केल्याबद्दल मी हार्मनी फाउंडेशनचे अभिनंदन करतो.या वर्षीच्या मदर तेरेसा स्मृती पुरस्कारासाठी सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हार्मनी फाऊंडेशनला त्याच्या भविष्यातील प्रत्येक कार्यात यश मिळो अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील हॉटेल ताज येथे मदर टेरेसा स्मृती पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस बोलत होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले, डॉ. अब्राहम मथाई हे समाजातील विविध घटकांमध्ये समंजसपणा, सद्भावना आणि बंधुता वाढवण्यासाठी हार्मनी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत. आज खऱ्या अर्थाने जगाला भगवान महावीरांची गरज आहे, आज आपल्याला भगवान बुद्ध, महात्मा गांधी आणि मदर तेरेसा यांच्यासारख्या महान राष्ट्र पुरुषांची गरज आहे, जे संपूर्ण मानवतेला पुन्हा शांती आणि सौहार्दाचा मार्ग दाखवू शकतील. सील आश्रम संस्था १९९९ पासून मुंबईच्या रेल्वे फलाट आणि रस्त्यांवर आढळणाऱ्या निराधार, आजारी आणि बेघर लोकांसाठी काम करते. सील संस्थेने मुंबई आणि त्यालगतच्या उपनगरात सापडलेल्या बेघर आणि निराधार लोकांना केवळ वाचवलेच नाही तर त्यांचे पुनर्वसनही केले आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. सील आश्रमाच्या कार्यामुळे आतापर्यंत ५०४ लोक त्यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले आहेत, जे खरोखरच प्रशंसनीय आहे.
राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की, ‘सील’ आश्रमात तरुण आणि वृद्ध, स्त्री-पुरुष, आजारी, हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या जीवांना नवीन जगण्याची संधी देतो. या आश्रमात मानसिक आधाराबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्यसेवा आणि उत्तम शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांचा शोध घेण्याचा आणि हरवलेल्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो.
जमशेद जीजीभॉय, नाना शंकरशेठ आणि इतरांनी मुंबई शहर आणि येथील लोकांसाठी खूप सेवाभावी आणि परोपकारी कार्य केले. आजही अनेक उद्योजक आपल्या व्यवसायातील काही वाटा सामाजिक कार्यासाठी वापरतात. त्यांनी सील आश्रमासारख्या संस्थांना पाठिंबा द्यायला हवा, असे मत राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशा लोगो यांनी केले.