बंद

    26.11.2022: राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 26, 2022

    राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली.

    भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले.

    यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.

    त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते.

    यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलीस महासंचालक महाराष्ट्र रजनिश सेठ व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

    यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.