26.11.2021: राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई अतिरेकी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण
राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली.
भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.
कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पाण्डे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.