26.01.2025: माननीय राज्यपालांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण
दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी, 76 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांचा छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमातील संदेश
भगिनींनो आणि बंधुंनो,
मी आपल्या देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर आणि सर्व महान नेते आणि समाजसुधारक यांसह भारतमातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी विनम्र अभिवादन करतो.
महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 100 दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व सरकारी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याची खातरजमा करण्यासाठी ऑनलाइन आणि मोबाइल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे निर्देश ही त्यांनी दिले आहेत.
सरकारी कामाला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) उपयोग केला जात आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘महापे’ येथे सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ज्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल. कारागृह सुधारणा आणि पायाभूत सुविधा वाढविण्याबाबतचे विधेयक माननीय राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले आहे.
थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहिले आहे आणि एफडीआय आकर्षित करण्यात राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
खरीप हंगाम 2023 करिता कापूस व सोयाबीन उत्पादन करणारे राज्यातील 68 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2800 कोटींहून अधिक रकमेची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
उदंचन जलविद्युत प्रकल्प धोरणांतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे 38 प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पांमुळे 55,970 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात मदत होईल आणि 2.95 लाख कोटी इतकी गुंतवणूक आकर्षित होईल.. याशिवाय 90,390 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला आणि अशा कुटुंबातील एका अविवाहित महिलेला 1500 रुपये प्रति महिना दिला जात आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, अन्नासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यात आला असून सुमारे 2 कोटी 46 लाख महिलांना सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.
खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी रोख बक्षीसमध्ये 4 ते 5 पटीने वाढ करण्यात आलेली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्र- मंडळ स्पर्धा व अन्य जागतिक स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकांच्या रकमेत देखील दहा पटीने वाढ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘महा वाचन उत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 95 लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना राज्यघटनेची उद्देशिका वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिडकोच्या ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमध्ये सुमारे 67 हजार परवडणारी घरे बांधण्यात येत आहेत.
किमान 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन मालवाहू क्षमता असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात मोठे ‘ग्रीनफिल्ड विमानतळ’ म्हणून पुढे येत आहे. एप्रिल 2025 पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा कार्यान्वयीत करण्याची योजना आहे.
सरकारने तृतीयपंथीयांसाठी धोरणे जाहीर केली आहेत.
बार्टी (बीएआरटीआय)संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटी (एएआरटीआय) संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
डिसेंबर 2024 अखेरपर्यंत एकूण 1,99,739 वैयक्तिक आणि 8,695 आदिवासी समुदायाचे वनहक्क दावे स्वीकारण्यात आले आहेत.
नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक वारस्याचे जतन करून पर्यटन विभागाकडून आदिवासी पर्यटनाला चालना दिली जात आहे.
माझ्या सरकारने जलसमृद्ध भागातील पाणी ज्या भागांत पाण्याची टंचाई आहे अश्या भागात वळविण्यासाठी वैनगंगा-नळगंगा, नार-गिरणा-पार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी आणि दमणगंगा-वैतरणा-गोदावरी या नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कामकाजात आणि इतर कामांमध्ये समृद्ध मराठी भाषेचा सतत वापर व्हावा यासाठी माझे सरकार प्रभावी पावले उचलत आहे.
जलयुक्त शिवार अभियान- दुसरा टप्पा ५८१९ गावांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत गाव आराखड्यानुसार १,४७,४९५ कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
आम्ही मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सुधारणा केली असून आता ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना वीस लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 25 लाख रुपयांचे सुधारित अनुदान दिले जाणार आहे.
राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील नाभिक, सोनार, तेली, बारी, लोणारी, लाडशाखीय वाणी / वाणी, शिंपी, लोहार, गवळी या समाजांसाठी महामंडळे (उपकंपन्या) व सुतार आणि विणकर या समाजांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यास तसेच गोवारी समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गोर बंजारा या जमातीच्या विकासासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जैन अर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंचीचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 30 जिल्ह्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. राज्यात माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
राज्यात 15 नवीन न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नाशिक येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय, हिंगोली येथे एक जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर येथील पाच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये, पुणे, नाशिक, वर्धा, नागपूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 दिवाणी न्यायालये (वरिष्ठ स्तर) यांचा समावेश आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर).
माझे सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करीत आहे.
मी सर्वांना एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करतो. एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पुन्हा एकदा, ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी आपण सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!!