26.01.2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल बैस यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल बैस यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २६) शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. राज्यपालांच्या हिंदी भाषणाचा अनुवाद अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी वाचून दाखवला.
शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव नितिन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, सैन्य दले, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली व सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या संचलनामध्ये भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, गडचिरोली व गोंदियाचे सी – ६० पथक, , बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई अग्निशनमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल व सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांच्या कंपन्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थी व युवकांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना दल (मुले / मुली), सी कॅडेट कोअर (मुले / मुली), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले व मुली), भारत स्काऊट आणि गाईड्स (मुले आणि मुली) यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पोलीस वाद्यवृंद तसेच पाईप बँड पथक यांना लोकांनी उत्स्फूर्त दाद दिली.