25.10.2023: बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार
बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार
बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणे, हा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
पूर्वी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये भारत पदकतालिकेत खालच्या क्रमांकावर राहत असे. परंतु, यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने पदकांचे शतक पार केले आहे. आज भारत खेळामध्ये आघाडीवर येत आहे आणि त्यात दिव्यांग खेळाडू देखील आघाडीवर आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक व युनिफाईड पार्टनर्स यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभाग संचालक डॉ भगवान तलवारे , तसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील सुवर्ण, रजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते.
स्पेशल ऑलिम्पिक मध्ये भारतातून १९४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी २०२ पदके जिंकली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत २० पदके जिंकली, असे स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया यांनी यावेळी सांगितले. स्पेशल ऑलिम्पिक मध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. बर्लिन येथे स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा जून महिन्यात झाल्या.