25.07.2025- विमा संस्थांनी पॉलिसीच्या विक्रीसोबत जनजागृती, विश्वासार्ह सेवावर भर द्यावा :- राज्यपाल
                                विमा संस्थांनी पॉलिसीच्या विक्रीसोबत जनजागृती, विश्वासार्ह सेवावर भर द्यावा :-
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन
आयबीएआयच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रम
मुंबई,दि. 25- विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृती, सुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू, आयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एस, सचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व नियामक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, विमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, प्रत्येकासाठी एक जीवन-विमा योजना असायलाच हवी. मात्र प्रत्येक योजना सर्वांनाच लागू होत नाही, सामान्य नागरिकांना विम्याची काही माहिती नसते, आयबीएआय संस्थेने योग्य व्यक्तीसाठी योग्य योजना सूचवली पाहिजे. ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. 25 वर्षांत आयबीएआय सदस्यांनी विमा क्षेत्राचा प्रसार, जोखीम जनजागृती व संपूर्ण देशभरातील उद्योग व ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र भारतातील विमा प्रवेश हा जीडीपीच्या तुलनेत विमा प्रीमियम अजूनही मर्यादित आहेत. २०२३ मध्ये भारताचा एकूण विमा प्रवेश फक्त ४.२ टक्के होता. त्यातील नॉन-लाईफ विमा क्षेत्रातील प्रवेश केवळ १ टक्के होता, यामुळे अजूनही ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिक विम्याच्या सुरक्षेपासून वंचित असल्याने याकडे संस्थेने सकारात्मक पहावे.
विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि उपयोगी उपाय सूचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, त्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्व अधोरेखित होते. ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशीही संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकास, ज्ञानाचे वाटप, आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्ये, ग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
विद्यापीठ स्तरावर विमा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पुढाकार
भविष्यातील विमा ग्राहक, शिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिक होऊ शकतात. ही व्यवस्था निर्माण होऊ शकते, यामुळे महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर विम्याचे शिक्षण दिले तर त्याचाही नागरिकांना उपयोग होणार आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रमाणपत्र आणि परीक्षा अभ्यासक्रमाचा विचार झाल्यास शिक्षण घेत असतानाच एखादी व्यक्ती विमा क्षेत्रात जावून व्यावसायिक होऊ शकते. युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राज्यातील विद्यापीठात आयबीएआयसोबत संयुक्तपणे विमा शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा मानस राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
विमा ही चैन नसून गरज आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे मध्यस्थ नाहीत तर जोखीम भागीदार, शिक्षक व सक्षमकर्ते आहेत. विमा दलाल हे प्रत्येक आव्हानास सामोरे जात भारताच्या “विकसित भारत” होण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
यावेळी आयबीएआयच्या 25 वर्षांतील स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, लोगोचे अनावरण झाले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष श्री. भरिंदवाल यांनी प्रास्ताविक केले तर आभार निर्मल बजाज यांनी मानले.