बंद

    25.07.2025: राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

    प्रकाशित तारीख: July 25, 2025
    25.07.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट देऊन तपासणी केली व जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली.
राजभवन, मुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

    राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट देऊन तपासणी आणि जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली.

    महिलांनी व मुलींनी कर्करोगासाठीची पूर्व चाचणी नियमितपणे करून घ्यावी. तसेच, कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे. पूर्व तपासणीतून रोग लवकर लक्षात आल्यास वेळेवर निदान व उपचार शक्य होतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    राजभवन, मुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती शिबिर व व्याख्यानाचे आयोजन (दिनांक १६ जुलै २०२५ रोजी) राजभवन क्लब येथे करण्यात आले होते.

    दिनांक २५ व २६ जुलै रोजी कर्करोग पूर्व निदानासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या शिबिरात ९ ते ४५ वयोगटातील मुली आणि महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. पुरुषांसाठी CBC, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, HPV टेस्ट, ENT तपासणी आणि प्रोस्टेट (PSA) टेस्ट यांचा समावेश करण्यात आला. एकूण ११० व्यक्तिंना ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लस देण्यात आली. सदर तपासणी शिबीरामध्ये एकूण १७१ कर्मचाऱ्यांनी सेवेचा लाभ घेतला.

    या वेळी आरोग्य तपासणी कार्यक्रमात कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका सप्रू बिसेन, कॅन्सर स्क्रिनिंग सेवा विभागाच्या कार्यकारी संचालिका सौ. नीता मोरे; स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पोयरेकर; तसेच जनरल सर्जन डॉ. सत्येंद्र मेहरा यांनी त्यांच्या तज्ञ टीम व कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे पदाधिकारी व राजभवन दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी, उपस्थित होते. राजभवन परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध तपासण्या करून घेतल्या.