बंद

    25.05.2023: केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनाने व्यापार सुलभीकरण करावे: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: May 25, 2023

    व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा
    केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनाने व्यापार सुलभीकरण करावे*: राज्यपाल रमेश बैस 

    महिला व्यापाऱ्यांसाठी अनुकुल वातावरण तयार करण्याची राज्यपालांची सूचना देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे.  व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक प्रशासनाशी अधिक येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनामध्ये ‘व्यापार सुलभीकरण’ (इज ऑफ डुईंग बिझनेस) करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 
    फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम) या व्यापारी संघटनांच्या शिखर संस्थेचा ४५ वा स्थापना दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २५) बिर्ला मातुश्री सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 
    कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन, महिला व बालकल्याण तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, महासचिव प्रितेश शहा, मानद अध्यक्ष विनेश मेहता, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष मेहता व राजेश शहा तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
    आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असताना किरकोळ व्यापार क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे, याकडे लक्ष वेधून महिलांनी व्यापार क्षेत्रात अधिक प्रमाणात यावे, यासाठी व्यापारी संघटनांनी अनुकुल वातावरण तयार करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.     
    एकीकडे नौकरीच्या मागे न लागता युवकांनी व्यापाराकडे वळावे असे आपण सांगत असतो आणि दुसरीकडे व्यापारी वर्गासाठी स्थानिक पातळीवर छोट्या मोठ्या अडचणी येत असतात. व्यापारी वर्गाला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाच्या कथा ऐकून दुःख होते, असे सांगून व्यापार संघटनांनी आपल्या अडचणींबाबत उपाययोजना  सुचविणाऱ्या शिफारसी शासनाकडे कराव्या असे राज्यपालांनी सांगितले.    
    आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यास तसेच महिन्यातून एकदा व्यापारी संघटनेस भेटण्यास तयार आहो, असे सांगून शासन व्यापाऱ्यांना हरप्रकारे मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.  फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शाह यांनी प्रास्ताविकात व्यापाऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख केला तसेच संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  राज्यपालांच्या हस्ते फॅम संघटनेच्या ध्वजाचे, स्मरणिकेचे तसेच संघटना गीताचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यापार विषयक धोरणावर आधारित नृत्य नाट्याचे सादरीकरण करण्यात आले.