25.03.2023 : लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस
लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस
लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व माध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. २५) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ‘इंडिया एसएमई लीडरशिप समिट’ परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हे असून या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळत असल्याचे सांगितले.
लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले.
युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, उदय अधिकारी, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना ‘इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.