बंद

    25.03.2023 माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: March 25, 2023

    माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस

    पालिका आयुक्त चहल, किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित

    अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

    राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. २५) मुंबईतील ५ करोना योद्ध्यांना तसेच दोन समाजसेवी संस्थांना करोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा व साऊथ इंडियन एजुकेशन सोसायटी या संस्थांच्या वतीने ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला सोसायटी व सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, उपाध्यक्ष एम. व्ही. रामनारायण व इतर मान्यवर उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, धारावी येथे सेवा बजावणारे सहायक पालिका आयुक्त किरण दिघावकर, धारावीतील डॉक्टर अनिल पाचणेकर, मंडप डेकोरेटर पास्कल सलढाणा व धारावी येथील शिक्षक व ऑटो रिक्षा चालक दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आले.

    एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केवळ दोन अडीच लाख लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. परस्पर सहकार्याने हे शहर वाढले आहे व त्याचा विकास झाला आहे. या शहरात कुणी एकमेकांची जातपात अथवा धर्म विचारत नाही. लोकल ट्रेन मध्ये तीन जागा असलेल्या बेंचवर चौथ्या माणसाला बसू देण्याचा सहकार्याचा भाव हेच खरे ‘मुंबईचे स्पिरिट’ असून मुंबईचा सहकार्याचा भाव देशानेही अंगिकारावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    डॉ व्ही शंकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले, तर पालिका आयुक्त आय एस चहल यांनी मुंबईच्या करोना व्यवस्थापनातील आव्हाने व यश या विषयावर मनोगत व्यक्त केले.
    ‘खाना चाहिए’ व ‘भजन समाज’ घाटकोपर या संस्थांना देखील करोना काळातील सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.