22.02.2022: राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान
राज्यातील ४० उत्कृष्ट डॉक्टर्स व समाजरत्न राजभवन येथे सन्मानित
राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान
‘सुभाष सिक्रेट’ पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे देखील केले प्रकाशन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
पुणे येथील कर्तव्यम सोशल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक संतोष बारणे व सचिव क्रांतीकुमार महाजन उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी क्रांतीकुमार महाजन यांनी लिहिलेल्या ‘सुभाष सिक्रेट’ या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे होत असताना ‘सुभाष सिक्रेट’ हे पुस्तक नव्याने वाचकांसमोर येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
केवळ शांतीने स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही तर त्यासाठी क्रांती देखील करावी लागेल या विचारांनी प्रेरित होऊन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना तयार केली. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असा प्रेरणादायी मंत्र त्यांनी देशवासियांना दिला असे राज्यपालांनी सांगितले.
करोना संसर्गाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून रुग्णांचे जीव वाचवले तसेच समाज सेवकांनी दया, दान व धर्म या शाश्वत मूल्यांचा परिचय देत जनता जनार्दनाची सेवा केल्यामुळे देश या महा संकटातून सहिसलामत बाहेर पडला, असे राज्यपालांनी सांगितले.
आपले काम समाजसेवेच्या भावनेने केल्यास ते काम पुण्यप्रद ठरते, असे राज्यपालांनी सांगितले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अध्यक्ष संतोष बारणे यांनी प्रास्ताविक केले तर क्रांती महाजन यांनी पुस्तका मागची भूमिका सांगितली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी उज्जवलकुमार भिमराव चव्हाण, डॉ. नेमजी करमशी गंगर, डॉ. शेख अख्तर हसन अली, डॉ. अलका भरत नाईक, सूर्यकांत महादेव गोवळे, अशोक शेषराव शिंदे, डॉ. सुनिल मारूती चव्हाण, सागर रतनकुमार कवडे, यशवंत रामदासजी कुर्वे, भास्कर निंबा अमृतसागर, मोहम्मद रियाज शेख, रामु वसंत पागी, सुनिल नंदलाल सिंग, दामोदर यशवंत घाणेकर, वसंतराव मारोतराव धाडवे, प्रतिभा जयंत भिडे, डॉ. यतीन त्र्यंबक वाघ, डॉ. वर्षा नितीन देशमुख, भाऊसाहेब संभाजी कोकाटे, डॉ. किशोर संतोष पाटील डॉ. रमेश उत्तमराव गोटखडे, यशपाल भाऊराव वरठे, डॉ. सुकन्या सुब्रम्हण्यम् भट, डॉ. निलय ग्यानचंदजी जैन, बंडू भाऊराव मोरे, रामदास तुकाराम कोकरे, सोमनाथ रामेश्वर वैद्य, प्रमोद सखाराम धुर्वे, सुरेश मारूती कोते, डॉ. अनिल गोपीनाथ रोडे, रोशन भगवान मराठे, जगन्नाथ सखाराम शिंदे, अमित गणपत गोरखे, श्रीमती जोत्सना शिंदे-पवार, आशिष शिवनारायण श्रीवास व श्रीमती आरती रणजितसिंह सचदेव यांना कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.