25.02.2021 : एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारंभ संपन्न
एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारंभ संपन्न
स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी: राज्यपाल
आधुनिक शास्त्रीय शिक्षण घेत असताना पाश्चात्य शिक्षण व जीवन शैलीचे अंधानुकरण होत आहे. मातृभाषा, भारतीय नैतिक मूल्ये व प्राचीन भारतीय ज्ञान या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, असे नमूद करून, स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.
पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत गुरुवारी (दि. २५) संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
स्नातकांनी केवळ नोकरी प्राप्त करण्याचे स्वप्न न पाहता उद्योजक होऊन इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या. त्यासाठी मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, कौशल्य भारत आदी योजनांचा लाभ घ्यावा. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. श्रमाला प्रतिष्ठा असून आपल्या देशात सुतारकाम करणाऱ्याला व्यक्तीला सन्मानाने विश्वकर्मा संबोधले जाते, तर मृदकाम करणाऱ्या व्यक्तीला प्रजापती म्हटले जाते. कोणतेही काम करताना ते अंतःकरण पूर्वक केल्यास त्यातून वैयक्तीक तसेच सामाजिक उन्नती साधली जाईल, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी माता, पिता, गुरु व देशसेवा करून आपल्या संस्थेचा लौकीक वाढवावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, कार्यकारी उपाध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात १२३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या.
**