24.12.2021: समाजात पुन्हा मोहम्मद रफी, तलत मेहमूद निर्माण व्हावे – राज्यपाल
राज्यपालांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार पुरस्कार प्रदान*
कविता कृष्णमूर्ती देखील सन्मानित
समाजात पुन्हा मोहम्मद रफी, तलत मेहमूद निर्माण व्हावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मोहम्मद रफी हे दैवी प्रतिभा लाभलेले महान गायक होते. उत्तम संगीताच्या माध्यमातून परमेश्वराशी तादात्म्य पावता येते. संकट प्रसंगी तसेच निराशेच्या प्रसंगी संगीतच मनाला नवी आशा व उभारी देते, असे सांगून समाजातून अनेक मोहम्मद रफी व तलत मेहमूद यांसारखे गायक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि . २४ ) ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी पार्श्वगायिका कविता कृष्णमुर्ती यांना देखिल मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविता कृष्णमुर्ती यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती तथा ज्येष्ठ व्हायोलिनवादक डाॅ. एल. सुब्रमण्यम यांनी पुरस्कार स्वीकारला. स्पंदन आर्टसतर्फे आयोजित हा पुरस्कार सोहळा रंगशारदा सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला.
मोहम्मद रफी उत्कृष्ट गायक, श्रेष्ठ माणूस : पं हृदयनाथ मंगेशकर
आपण १० वर्षाचे असताना बैजू बावरा या चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबत गायले होते. त्यानंतर हरिश्चंद्र तारामती या चित्रपटात मोहम्मद रफी यांनी आपल्या संगीत निर्देशनाखाली गाणे गायले होते अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली. ईश्वराचे देणे लाभलेले मोहम्मद रफी दर शुक्रवारी गोर-गरीब लोकांना पैसे वाटत ही आठवण सांगताना मोहम्मद रफी हे उत्कृष्ट गायक, संगीतकार तसेच श्रेष्ठ माणूस होते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, प्रतिमा आशिष शेलार तसेच मोहम्मद रफी यांच्या कुटुंबातील सदस्य यास्मीन व नसरीन तसेच संगीतप्रेमी उपस्थित होते.
यावेळी दिवंगत जनरल बिपीन रावत यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमानंतर जीवनगाणी हा मोहम्मद रफी यांच्या अजरामर गाण्याचा कार्यक्रम झाला.