24.10.2025 : पंतप्रधानांच्या सूचनेनुसार नैसर्गिक शेती विषयावरील चर्चासत्राचे आयोजन
 
                                पंतप्रधानांच्या सूचनेनुसार नैसर्गिक शेती विषयावरील चर्चासत्राचे आयोजन
नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे राज्यपालांचे आवाहन
रासायनिक शेतीमुळे देशभरातील जमीन वाळवंट होत आहे. जमीन, पाणी व हवा प्रदूषित होत आहे. अन्नधान्य विषयुक्त होत आहे. भावी पिढी आरोग्यवान व्हावी याकरिता नैसर्गिक शेती करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे राज्य मंत्रिपरिषदेचे सदस्य व विधानमंडळाच्या सदस्यांसाठी ‘नैसर्गिक शेती’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
चर्चासत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मंत्री, राज्यमंत्री, राज्य विधान मंडळाचे सदस्य, मुख्य सचिव राजेश कुमार, विविध विभागांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.
नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन घटते हा मोठाच गैरसमज आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन वाढते व सोबतच पर्यावरण रक्षण देखील होते. नैसर्गिक शेतीमध्ये समस्त प्राणिमात्रांचे कल्याण अंतर्भूत आहे. त्यामुळे ‘नैसर्गिक शेती’ हे पवित्र कार्य असून ते धर्मातीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.
जैविक शेती म्हणजेच नैसर्गिक शेती असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु जैविक व नैसर्गिक शेतीमध्ये आमूलाग्र फरक आहे असे त्यांनी सांगितले. आपण अनेक प्रयोगातून अनुभव घेतला आहे की जैविक शेती किफायतशीर नाही, परंतु नैसर्गिक शेती अतिशय किफायतशीर आहे असे राज्यपालांनी सांगितले.
रासायनिक शेती ७० वर्षे जुनी आहे. त्यापूर्वी लोकांना कर्करोग, हृदयविकार अभावाने होत. त्याकाळी भाजी फळांना चव होती. रासायनिक खतांमुळे अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी होत आहे, लठ्ठपणा वाढत आहे, भयानक रसायने पोटात जात आहेत. मातेच्या दुधात देखील रसायने दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीतील पाण्यात कीटकनाशक जात आहेत. पावसाचे पाणी देखील विषयुक्त होत आहे. विदेशातून हजारो कोटी रुपयांची खते आणून आपण आपलेच अन्नधान्य विषमिश्रित करीत आहोत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हरित क्रांती त्यावेळची गरज होती. परंतु आज रसायनांमुळे जमीन वाळवंट होत आहे, लोकांचे आरोग्य बरबाद होत आहे असे सांगून आज लहान मुले देखील हृदयविकाराने दगावत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोधन रक्षण झाले पाहिजे असे सांगून आज देशातील ५५ देशी गायी नामशेष होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आज गुजरात मध्ये ९ लाख शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहे. नैसर्गिक शेतीचे अतिवृष्टीने नुकसान होत नाही. अवर्षण व अतिवृष्टी दोन्हीवर उपाय नैसर्गिक शेती आहे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी सर्वांना नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचे अभिवाचन मागितले.
महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचे हब तयार करणार : मुख्यमंत्री
राज्यपाल देवव्रत यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून प्रेरणा घेऊन गुजरात प्रमाणे महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे हब करण्याचे कार्य राज्यात केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे व्रत हाती घेतले आहे. नीती निर्धारण करणाऱ्या विधायकांना नैसर्गिक शेतीचा विचार पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ‘नैसर्गिक शेती’ या विषयावरील परिषदेचे आयोजन केले आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला ईश्वराचा दर्जा दिला आहे. नैसर्गिक शेतीमध्ये गोमातेचा उपयोग सर्वाधिक आहे. संविधानकारांनी या शास्त्रीय विचाराला समोर ठेवून गोहत्याबंदी सांगितली होती. गोधन कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. नैसर्गिक शेतीमध्ये गोधन महत्वाचे आहे व त्याला वैज्ञानिक आधार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जगभरातील तीव्र वातावरण बदलावर नैसर्गिक शेती हा शाश्वत उपाय आहे. देशातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे. नैसर्गिक शेती त्याला वरदान ठरेल असे फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे. आपण स्वतः प्रगतिशील शेतकरी असून आपल्या शेतात अनेक नवनवे प्रयोग करीत असल्याचे सांगून नैसर्गिक शेती ही समाजाची व देशाची गरज आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
विधान मंडळ सदस्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी, या विषयावर जनजागृती करावी व त्यासंदर्भात लोकांचे गैरसमज दूर करावे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
आज अन्नधान्याला पूर्वीसारखी चव राहिली नाही. रासायनिक शेतीमुळे कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक आजार विषयुक्त अन्नामुळे होत आहेत. नैसर्गिक शेतीमुळे अन्न विषमुक्त व अमृतयुक्त होईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
         
        