24.09.2022 : डॉ हेमलता बागला यांची एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
डॉ हेमलता बागला यांची एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
के.सी. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ हेमलता कपिल बागला यांची हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ हेमलता बागला यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली आहे. गेले वर्षभर त्या एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार पाहत होत्या.
डॉ हेमलता बागला यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात एम.एस्सी. व अजैविक रसायनशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.
डॉ हेमलता बागला यांनी एचएसएनसी विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिष्ठाता पदावर काम केले आहे, तसेच निरंजन हिरानंदानी स्कुल ऑफ रिअल इस्टेट या संस्थेच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. सन २०१७ पासून त्या के.सी. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून काम पाहत आहेत.