बंद

    24.05.2022: स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: May 24, 2022

    स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    ‘प्रभारी देखील प्रभावी काम करतात’ : राज्यपाल

    विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी : डॉ भूषण पटवर्धन

    देशात पुनरुत्थान होत असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वकष प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

    अनेक विद्यापीठांमध्ये प्रभारी कुलगुरु व प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत याची दखल घेऊन अनेकदा प्रभारी अधिकारी मनापासून काम करीत असल्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतात असे राज्यपालांनी सांगितले.

    ग्रामीण भाग देशाला लागणाऱ्या अन्नधान्याची पूर्तता करीत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील जळगाव सारखी विद्यापीठे मुंबई, पुणे येथील विद्यापीठांपेक्षा कमी महत्वाची नाहीत असे राज्यपालांनी सांगितले.

    बहिणाबाई चौधरी यांची ‘अरे संसार संसार’ ही ओवी म्हणून दाखवताना बहिणाबाईंच्या कविता संत कबीर यांच्याप्रमाणे प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांकरिता रोल मॉडेल होते. पंतप्रधान मोदी देखील देशासाठी २० – २० तास काम करीत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श समोर ठेवून जीवनात अधिक उंची गाठावी असे राज्यपालांनी सांगितले. आज विविध विद्यापीठांमध्ये ८० टक्के सुवर्ण पदके विद्यार्थिनी प्राप्त करीत आहेत ही आगामी भारताची नांदी आहे असे राज्यपालांनी सांगितले. पूर्वी शिक्षणातून यांत्रिकी पद्धतीने पदवीधर बाहेर पडत होते. आज देशाला चारित्र्यवान युवकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी : डॉ भूषण पटवर्धन

    आपल्या दीक्षांत भाषणात नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह काही विद्यापीठांमध्ये कुलगुरुपद प्रभारी व्यक्तींकडे आहे तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनेक पदांवर प्रभारी व्यक्ती काम करीत आहेत याकडे लक्ष वेधून विद्यापीठांमध्ये अधिकाऱ्यांची तसेच शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास त्याचा विद्यापीठांच्या मूल्यांकनावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

    विद्यापीठांनी पाश्चात्य संकल्पनांचे अंधानुकरण करू नये तसेच पाश्चात्य तेच आधुनिक ही मानसिकता बदलावी असे पटवर्धन यांनी सांगितले. विद्यापीठे निर्बंध मुक्त असावी व ग्रामीण भागातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शेती शिकण्याची देखील मुभा असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी काही महिने इतर विद्यापीठांमध्ये तसेच ग्रामीण भागात व्यतीत केल्यास त्यांना समाजातील प्रश्न अधिक चांगले समजतील व एकात्मता वाढेल असे त्यांनी सांगितले.

    कुलगुरु डॉ विजय माहेश्वरी यांनी यावेळी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले.

    दीक्षांत समारोहात २०,०७५ विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी २१४ स्नातकांना आचार्य पदवी तर ९८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

    यावेळी विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरु प्रा. सोपान इंगळे, प्रभारी कुलसचिव डॉ किशोर पवार, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉ दीपक दलाल व स्नातक उपस्थित होते.