बंद

    23.11.2022 : पर्यावरण, डिजिटलायझेशन, व्यापार आदी विषयात भारतासोबत सहकार्य वाढवणार : राजदूत जॅन थेसलेफ

    प्रकाशित तारीख: November 23, 2022

    पर्यावरण, डिजिटलायझेशन, व्यापार आदी विषयात भारतासोबत सहकार्य वाढवणार : राजदूत जॅन थेसलेफ

    स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत ‘हरित संक्रमण भागीदारी’ सुरु करीत असून या संदर्भात मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजदूतांनी यावेळी दिली. या भागीदारी अंतर्गत स्वीडिश कंपन्या भारतातील सिमेंट, स्टील आदी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना पर्यावरण पूरकतंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वीडन भारताशी पर्यावरण रक्षणासह डिजिटलायझेशन, व्यापार आदी क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    स्वीडनकडे पुढील वर्षी युरोपिअन युनिअनचे अध्यक्षपद येत आहे, तर भारत देखील २०२३ मध्ये जी २० समूहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती राजदूतांनी दिली.

    स्वीडन मध्ये पन्नास हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक भारतीय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    आयकिया, एरिकसन, एच अँड एम आदी अनेक स्वीडिश कंपन्या भारतात कार्य करीत असून भारतासोबतचे व्यापार व वाणिज्य संबंध अधिक वाढवण्यासाठी स्वीडनमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारचे व्यापार मंत्री डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर येत असल्याची माहिती राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपालांना दिली.

    राज्यपालांनी राजदूतांचे स्वागत करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

    बैठकीला स्वीडनचे मुंबईतील प्रतिनिधी एरिक माल्मबर्ग हे देखील उपस्थित होते.