23.09.2023: सहकार चळवळीमुळे गरीब व शेतकऱ्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त : राज्यपाल
सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला नवसंजीवनी : अमित शाह
सहकार चळवळीमुळे गरीब व शेतकऱ्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त : राज्यपाल
सहकार चळवळ कालबाह्य झाली नसून, सहकार मंत्रालय स्थापनेनंतर सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून आगामी काळात सहकाराच्या माध्यमातून करोडो लोकांना विकास प्रक्रियेशी जोडले जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठ व सहकार भारती यांनी आयोजित केलेल्या ‘लक्ष्मणराव इनामदार स्मृति व्याख्यान मालेत’ अमित शाह यांनी ‘आजच्या संदर्भात सहकारी चळवळ’ या विषयावरील पुष्प गुंफले, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या व्याख्यानमालेला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, सहकार भरतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकुर व महामंत्री डॉ. उदय जोशी, आदी उपस्थित होते.
सन २०१४ पर्यंत देशातील ६० टक्के लोकांकडे बँकेचे खाते नव्हते व ते अनौपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडले होते. आज या ६० टक्के लोकांकडे बँकेची खाती आहेत, घर आहे, वीज, पाणी तसेच पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला अर्थवव्यवस्थेशी जोडायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात सहकार चळवळ जुनी आहे. मधल्या काळात सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप झाल्याने सहकार क्षेत्राचे नुकसान झाले असे सांगून अमूल, लिज्जत पापड ही सहकारी चळवळीची सर्वोत्कृष्ट उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.
लक्ष्मणराव इनामदार हे पारस मण्यासारखे होते. त्यांच्या सहवासात आलेल्या कार्यकर्त्यांचे सोने व्हायचे असे त्यांनी सांगितले. त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांमुळे गुजरातेतील सार्वजनिक जीवन उन्नत झाले, असे अमित शाह यांनी सांगितले.
नारी शक्ती वंदन विधेयक पारित झाल्याबद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन करुन सहकार आंदोलनाच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादनात हरित क्रांती तर दूध उत्पादनात श्वेत क्रांती झाली, असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
सहकार चळवळ ग्राम विकास साधून गरीब व शेतकऱ्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते असे राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.
साखर व दूध या क्षेत्रांशिवाय सहकाराच्या माध्यमातून राज्यात मधाची गावे विकसित केली जात असून केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामुळे देशाची अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलर इतकी होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
लक्ष्मणराव इनामदार सातारा जिल्ह्यात जन्मले. परंतु त्यांनी गुजरात व महाराष्ट्रात समन्वयक म्हणून काम केले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर सहकार भारतीचे महामंत्री डॉ उदय जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.