23.02.2025 : विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा
मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन
अमरावती, दि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत होऊन संपादन करावे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, विद्यापीठ स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण देत आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्राविण्य मिळवावे. आजच्या घडीला खेळाडू सर्वांधिक मानधन घेत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी पाठिंबा देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत.
केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी भाषेतून विपूल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनीही जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि तिचे जतन करावे. त्यासोबतच इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरित केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांमुळे स्थानिक उद्योगांना पुरक वातावरण तयार होईल. उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करावे. रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करताना काम आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोनही येणे गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांतून प्रधानमंत्र्यांचे 2047मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल.
न्यायमुर्ती श्री. गवई म्हणाले, जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली आहे. त्यांनी समाजाचे प्रबोधन करून मत परिवर्तन केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. आजच्या काळात शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती बाळगून शिक्षणातून प्रगती करावी, तसेच शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा. आत्मसात केलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून नवा भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीवर आहे. सक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी विद्यापिठाने ओळखून कार्य करावे. सर्वदूर आणि सर्वस्तरातील घटकांना शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठाने कार्य करावे. प्रामुख्याने ग्रामीण विकास मोहिम राबवून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत करावी. विद्यार्थ्यांनीही समाजाच्या विकासासाठी अविरत संघर्ष करून अभावग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी स्वागतपर भाषण व समारंभाचे प्रास्ताविक केले. तसेच अहवालाचे वाचन केले. विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर आजतागयात विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेले संशोधन, विद्यार्थी हितनारुप कार्य, राबविलेले शैक्षणिक उपक्रम, मिळविलेले विविध पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आदी संदर्भात सविस्तर माहिती दिली. पदवी, पदके आणि पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांनी यावेळी केले.
दीक्षांत समारंभप्रसंगी सुरवातीला राज्यपाल यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. दीक्षांत समारंभात सुवर्ण पदके पटकाविणाऱ्या शितल पांडव, निकिता देवचे, अनिकेत पांडे, राधा चमेडिया, हर्षाली हटवार, उत्कर्षा वानरे, धनश्री सरकळे, लक्ष्मी चौधरी, प्राची बोरगावकर, शेख इक्रा अदीबा मोहमंद मुश्ताक या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
प्रदान केलेल्या आचार्य पदवी, पदवी, पदविका, पदके व पारितोषिके या विषयी:
दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखेत 350 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या आचार्य पदवी धारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 146, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील 48, मानव विज्ञान विद्याशाखेतील 118, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील 38 आदी पदवीधारकांचा समावेश आहे.
दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखेतील 38 हजार 305 विद्यार्थ्यांना पदवी आणि 238 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्यात. तसेच विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके व 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.