22.09.2022 : “नेते बना; नेतेगिरी करु नका”: राज्यपालांची युवकांना सूचना
“नेते बना; नेतेगिरी करु नका”: राज्यपालांची युवकांना सूचना
चांगला नेता होण्यासाठी होण्यासाठी प्रथम चांगले अनुयायी व्हा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
काही लोकांमध्ये नेतृत्वगुण उपजत असतात. इतरांनी नेतृत्वगुण प्रयत्नपूर्वक बाणवले पाहिजे असे सांगताना युवकांनी नेते अवश्य बनावे परंतु नेतेगिरी करु नये, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज युवकांना केली.
एक वाईट सैनिक चांगला सेनानी कधीही होऊ शकत नाही. यास्तव चांगला नेता होण्यासाठी प्रथम चांगले अनुयायी झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
दैनिक सकाळच्या यंग इनोव्हेटर्स नेटवर्क (यिन) च्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांच्या केंद्रीय व राज्यस्तरीय अभिरुप मंत्रिपरिषद सदस्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
युवकांनी लोकशाही, राजकारण व समाजकारण या विषयांमध्ये रुची घ्यावी या उद्देशाने सुरु केलेला सकाळचा ‘यिन’ उपक्रम स्तुत्य आहे राज्यपालांनी सांगितले.
अंदाजे ६० – ७० वर्षांपूर्वी आपण महाविद्यालयात असताना अभिरूप संसदेत भाग घेत असू याचे स्मरण करुन ‘सकाळ’ने यिन उपक्रम महाविद्यालयांपर्यंत नेल्याबद्दल राज्यपालांनी उपक्रमाचे कौतुक केले.
महाविद्यालयात असताना आपण महासचिव म्हणून निवडून आलो होतो याची आठवण सांगताना युवकांना समाज कार्याची आवड व अंतःप्रेरणा असल्यास हाती घेतलेले कार्य अधिक चांगले होते असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळी आपल्याला वाईट वाटते असे नमूद करून युवा सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जगण्याची उमेद दिली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले
यावेळी यिन अभिरूप पंत्रप्रधान दिव्या भोसले व यिन अभिरूप मुख्यमंत्री पार्थ देसाई यांसह मंत्रिपरिषद सदस्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले.
कार्यक्रमाला यिन कार्यक्रमाचे संयोजक संदीप काळे व इतर सदस्य उपस्थित होते.