22.07.2025: सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या सोबत संवाद

“ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम
: राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या सोबत संवाद
मुंबई,दि.२२ : भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा असून,या उपक्रमात सिक्कीम मधील युवक-युवतींच्या सक्रिय सहभागामुळे देशाच्या समावेशक आणि ऐक्यपूर्ण भविष्यासाठी नवसंजीवनी मिळेल असा विश्वास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
राजभवन येथे भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” उपक्रमांतर्गत आयोजित नॅशनल इंटीग्रेशन टूर अंतर्गत सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भेट दिली.मेजर सृजन सिंह नेगी,मेजर आरती रावत, सिक्कीम विद्यापीठाचे १५ विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, सिक्कीमधील विविध गावांतील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचा हा विशेष योग माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. मेजर सृजन सिंह नेगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले पाहिजे.लष्कर केवळ देशाच्या संरक्षणाचे कार्य करत नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समृद्धीसाठीदेखील सातत्याने काम करत आहे.देशाच्या विविध भागांतील तरुणांना एकमेकांच्या संस्कृतीशी जोडणाऱ्या या दौऱ्यामुळे सद्भावना, सांस्कृतिक आदान-प्रदान आणि एकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
राज्यपाल म्हणाले की,या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे महाराष्ट्राची संस्कृती तसेच इथली भौगोलिक माहिती मिळण्यास मदत होईल. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवासाचा अनुभव या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडेल.विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपालांनी विविधतेतील एकतेचा संदेश दिला आणि त्यांच्या प्रवासातील अनुभवातून प्रेरणा घेऊन,एकता व सांस्कृतिक वारशाची माहिती या विद्यार्थ्यांना होणार आहे असेही ते म्हणाले. राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतभूमीसाठी असलेल्या आपल्या सर्वांच्या कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल सांगितले.तसेच त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अनुभव जाणून घेतला. विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली.
मेजर सृजन सिंह नेगी यांनी यावेळी भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटीची माहिती दिली.
राजभवन मधील आदरातिथ्य पाहून विद्यार्थ्यी गेले भारावून
सिक्कीम विद्यापीठाचे लॅक्चूम लेक्चा,सोनम लेक्चा,लाका डोमा या विद्यार्थ्यांनी राज्यपालांशी केलेल्या संवादादरम्यान “आम्ही आयुष्यात प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे.मुंबई अनेकदा चित्रपटांमधून पाहिली होती. पण आज प्रत्यक्ष पाहताना ती खरोखरच भव्य आणि मनमोहक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.उंचच उंच इमारती आणि प्रचंड लाटांचा समुद्र पाहून मन प्रसन्न झाले असल्याचे सांगितले.”या दौऱ्यात आम्हाला राज्यपालांकडून मिळालेले प्रेम, आतिथ्य आणि आपुलकी अत्यंत भावले असून याबददल आम्ही आमच्या आईवडील, शिक्षक आणि मित्रांना या अद्भुत अनुभवाबद्दल सांगणार आहोत.
दि. १७ जुलै रोजी त्यांनी सिक्कीमहून महाराष्ट्रात आल्यापासून हॉटेल ताज येथील निवासव्यवस्था, संपूर्ण दौऱ्यात प्रत्येक सोयीसाठी विशेष लक्ष देण्यात आले.विद्यार्थ्यांनी एन.डी.ए.मधील प्रशिक्षण आणि शिस्तबद्धतेचा अनुभव घेतल्याचे सांगितले. मुंबईतील गिरगाव चौपाटी, अटल सेतू, गेटवे ऑफ इंडिया ही प्रेक्षणीय स्थळे त्यांनी पाहिली. तसेच मुंबईतील प्रसिद्ध बाजारात खरेदीचाही अनुभव घेतला.“मुंबई विषयी जे काही ऐकले होते, ते प्रत्यक्षात अनुभवता आले. आज आम्हाला राज्यपालांशी भेट घेण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील या दौऱ्यात खूप काही शिकता आले, राजभवन येथील भेटीचा हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “येथे शिकलेल्या गोष्टी भविष्यात देशसेवेच्या मार्गावर उपयोगी पडतील,” असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.