बंद

    22.03.2025: महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा

    प्रकाशित तारीख: March 23, 2025
    22.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत  महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.   'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून राजभवनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिहारचे राज्यगीत व भोजपुरी गीत सादर केले तसेच मिथिला प्रदेशाचे लोकनृत्य झिझिया व जट-जटिन सादर केले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्यपालांचा सत्कार केला. कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

    महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे शनिवारी (दि. २२ मार्च) बिहार राज्य राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

    ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राजभवनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले.

    भारताला सशक्त राष्ट्र बनवायचे असेल तर सर्व राज्यांना सशक्त बनवावे लागेल. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध राष्ट्र राहिल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय मताचा आदर केल्या जातो असे राज्यपालांनी सांगितले. देशाच्या विरोधात अनेक शक्ती कार्यरत आहेत. अश्यावेळी एकात्मता हे देशाचे मोठे बलस्थान असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतीय पंतप्रधानांना भेटीसाठी वेळ देत नसत, त्याउलट पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वेळ देत असत. मात्र, आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून घेत आहेत, असे सांगून बदललेली परिस्थिती सशक्त भारताचा परिणाम असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    बिहार राज्याचे देशाच्या प्रगती आणि विकासात मोठे योगदान असल्याचे नमूद करून बिहारने देशाला पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, संपूर्ण क्रांतीचे जनक जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर यांसारखे थोर नेते दिल्याचे राज्यपालांनी सांगितले. गुरु गोविंदसिंह यांचा जन्म बिहारमध्ये झाला तसेच जैन धर्माची मुळे या राज्यात आहेत. बुद्ध धर्माचा प्रचार बोधगयेपासून झाला असेही राज्यपालांनी सांगितले.

    बिहार दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिहार राज्य व्यासपीठावर प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ‘मेरे भारत के कंठहार, तुझको नमन शत शत बिहार’ हे बिहारचे राज्यगीत सादर केले. त्यानंतर बिहार राज्याची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यानंतर मिथिला प्रदेश येथील ‘झिझिया’ नृत्य, भोजपुरी गीत तसेच ‘जट-जटिन’ हे लोकनृत्य सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतानाच अनिकेत खाजेकर या विद्यार्थ्याने शिल्पाकृती व सुभाष या विद्यार्थ्याने पेंटिंग तयार केले.

    राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.