21.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राष्ट्रसेवेला समर्पित जीवन : रामनाथ कोविंद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राष्ट्रसेवेला समर्पित जीवन : रामनाथ कोविंद
पदाची अपेक्षा सोडल्यास देशाची सेवा अधिक चांगली करता येते : राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल हसत खेळत चुकीची जाणीव करून देतात* : देवेंद्र फडणवीस
तीन वर्षांच्या कार्यकाळातील दोन वर्षे करोना असून देखील संपूर्ण राज्यभर अविश्रांत भ्रमण करणारे, मराठी भाषा शिकून जनसामान्यांशी संवाद साधणारे व राजकारणात राहून साधेपणा जपणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रसेवेला समर्पित जीवन आहे. त्यांच्यावरील पुस्तक हे मानवी मूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व साधेपणाचे संकलन आहे असे उद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे काढले.
कोविंद यांच्या हस्ते ‘भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे बुधवारी (दि. २१) राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुस्तकाचे लेखक डॉ तुषार कांती बॅनर्जी तसेच निमंत्रित उपस्थित होते.
टिहरी धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उत्तराखंड येथे अनेक शाळांची स्थापना, तसेच विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा व लोकसभा सदस्य म्हणून व्यापक कार्य करून कोश्यारी यांनी सर्वांकरीताच अनुकरणीय काम केले आहे असे सांगून पहाटे उठणारे कोश्यारी हे राजभवनात मनुष्य रूपात बसलेले राज्यपालच नाहीत तर ते एक संत आहेत, असे कोविंद यांनी सांगितले.
ते हसत खेळत चुकीची जाणीव करून देतात* : देवेंद्र फडणवीस
अनेकदा पुस्तकाचे शीर्षक व व्यक्तीचे स्वभावगुण विपरीत असतात. परंतु कोश्यारी हे ‘अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या त्यांच्यावरील पुस्तकाच्या नावाप्रमाणेच देशाला समर्पित व्यक्तीमत्व आहे असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
करोना प्रकोपामुळे कुणीही प्रवास करीत नसताना राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सुदूर आदिवासी भागांचा दौरा केले, तेथे जाऊन राहिले, तेथील समस्या जाणून घेतल्या व प्रश्नांचा पाठपुरावा केला. कोश्यारी यांनी तीन वर्षात १०७७ कार्यक्रम व ४८ विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहाना उपस्थित राहून एक विक्रम केला असे सांगताना आपल्या कार्यपद्धतीमुळे कोश्यारी यांनी राजभवनाला लोकभवन केले फडणवीस यांनी सांगितले.
वन रँक वन पेन्शन अहवाल तयार करून जवानांना न्याय मिळवून देण्यात जितके श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे तितकेच ते राज्यपाल कोश्यारी यांचे आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
कोश्यारी हे हसत खेळत असे काही बोलतात की समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव होते असे सांगताना मनात स्वार्थ नसल्यामुळे कोश्यारी जे काही करतात ते समाजासाठी असते असे फडणवीस यांनी सांगितले.
पदाची लालसा सोडल्यास देशाची अधिक चांगली सेवा होईल* : राज्यपाल कोश्यारी
आपण पदप्रतिष्ठेला फार महत्व दिले नाही. परंतु आज लोक पदाच्या मागे लागतात, असे नमूद करून पदाची लालसा सोडल्यास आपण देशाची अधिक चांगली सेवा करू शकतो असे राज्यपालांनी सांगितले.
देवाची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस देशासाठी मोठे कार्य करतील
देवेंद्र फडणवीस देशाकरिता आशेचे किरण आहे असे नमूद करून देवाची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस देशासाठी खूप मोठे कार्य करतील, असे राज्यपालांनी सांगितले.
असंख्य संकटे आली, तरीही आपला देश आणि संस्कृती साधू, संतांच्या त्यागामुळे जिवंत आहे असे सांगून प्रत्येकाने निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य केले तर भारत महान राष्ट्र होईल असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.
लेखक तुषार कांती बॅनर्जी यांनी प्रास्ताविक केले तर आनंद सिंह यांनी सूत्र संचलन केले. पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या आशादीप संस्थेचे अनिरुद्ध मंडळ हे देखील यावेळी उपस्थित होते.